अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नागेश विक्रम भोसले टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. पारनेर पोलीस ठाणे हद्दीतील पठारवस्ती, सोबलेवाडी येथे दि. २५ जानेवारी रोजी अज्ञात दरोड्याखोरांनी लोखंडी सळई व लाकडी दांडके घेऊन घरात प्रवेश करत जबरदस्तीने सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी लंपास केली होती.
तपासादरम्यान सदरचा गुन्हा भोसले टोळीतील ने केल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी सिध्देश सादीश काळे, अजय सादीश काळे, धिरज सादीश काळे, नागेश विक्रम भोसले, गणेश सुरेश भोसले, बाळू झारु भोसले, आवडया सुभाष उर्फ टुब्या भोसले, श्रीहरी हरदास चव्हाण, देवीदास जैनू काळे आणि एक विधीसंघर्षीत बालकाला अटक करण्यात आली होती.
तपासादरम्यान,पोलिसांनी टोळीविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची कुंडली काढली.
टोळीने पारनेर, सुपा, एमआयडीसी, भिंगार कॅम्प व बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अनेक दरोडे, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याची या टोळीची पद्धत लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सदर प्रकरणी प्राप्त पुराव्यांच्या आधारे आणि मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परीक्षेत्र यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मा. अपर पोलीस महासंचालक (का.व.सु), महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्वपरवानगीने मा. मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर करुन आरोपी नागेश विक्रम भोसले व त्याचे साथीदार यांचे टोळीविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहा. पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, पोहेकॉ रवींद्र पांडे, पोकों/निखिल मुरुमकर, पोकों/अभिजीत बोरुडे, पोकों/सचिन वीर, पोकों/विवेक दळवी यांचे पथकाने केलेली आहे.



