नवी दिल्ली / नगर सह्याद्री : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. परंतु याचा त्यांना राजकीय फायदाही होताना दिसत आहे. कारण माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह हे जयंत चौधरी यांचे आजोबा आहेत. व ते सध्या इंडिया आघाडीत आहेत. चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न दिल्याने जयंत चौधरी हे भाजपाच्या जवळ गेलेत. जयंत चौधरी यांना पत्रकारांनी एनडीएत सहभागी होणार का असा प्रश्न केला तेव्हा आता मी कुठल्या तोंडाने नकार देऊ असं सूचक विधान केले.
जयंत चौधरी म्हणाले की, आज देशासाठी खूप मोठा दिवस आहे. मी भावूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार मानतो. देश त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान मोदी देशाची नस अचूक ओळखतात. आज कमेरा समाज, शेतकरी आणि कामगारांचा सन्मान होत आहे. हे करण्याची क्षमता अन्य कुठल्याही सरकारमध्ये नव्हती. मला माझे वडील अजित सिंह यांची आठवण येते. मी किती जागा घेणार यापेक्षा मी कुठल्या तोंडाने नकार देणार आहे? जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार मी माझं म्हणणं मांडेन असं त्यांनी म्हटलं.
सूत्रांनुसार, भाजपा आणि आरएलडी आघाडी निश्चित आहे. आरएलडी २ जागांवर निवडणूक लढेल. त्याशिवाय जयंत चौधरी यांच्या आरएलडीला राज्यसभेची एक जागा दिली जाईल. या दोन्ही पक्षांच्या आघाडीची लवकरच घोषणा होईल. पश्चिम यूपीत जाट, शेतकरी आणि मुस्लीम बहुल भाग आहे. याठिकाणी लोकसभेच्या २७ जागा आहेत, २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १९ जागा जिंकल्या होत्या.
नरसिंहराव, चरणसिंह, स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर
केंद्र सरकारने माजी पंतप्रधान (कै.) पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी म्हणतात, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकर्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी देशाला प्रेरणादायी आहे. नरसिंह राव यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ महत्त्वाच्या उपाययोजनांद्वारे चिन्हांकित होता. यामुळे भारताला जागतिक बाजारपेठेसाठी खुले केले. परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान बहुआयामी वारसा अधोरेखित करते डॉ. एम एस स्वामीनाथनजी यांना आपल्या देशातील कृषी आणि शेतकर्यांच्या कल्याणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी भारतरत्न देऊन सन्मानित करत आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे कार्य अमूल्य आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे.