अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. आ. संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुमारे 2 तास रस्तारोको आंदोलन करून प्रशासनास धारेवर धरत निषेध नोंदवला. त्यानंतर अवघ्या सहा तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले.
राज्यातील महायुती सरकारने गोहत्या बंदी कायदा आणला आहे. मात्र तरीही हे जिहादी राजरोसपणे वारंवार गोहत्या करत आहेत. रस्त्यावर गोमांस टाकत आहे. प्रशासन याकडे कानाडोळा करत हिंदूंच्या भावनांशी खेळत आहे. शहरात राजरोसपणे घराघरात छुपे कत्तलखाने सुरु आहेत. मध्यरात्री नंतर गाड्या भरून माल पाठवला जातो. याविरोधात प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी करत आ. संग्राम जगताप यांनी रस्त्यावर गोमातेचे मांस आणून टाकणाऱ्यांना 24 तासात अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने तपास सुरु केला. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे, तपास पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड व दोन संशयित इसमांचा शोध घेतला असता, त्यातील तरबेज आबीद कुरेशी (वय 24, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दोन गोवंशीय जनावरांची राहत्या घरी कत्तल करून मांस विक्री केली. तसेच उर्वरित अवशेष फेकण्यासाठी ओळखीच्या दोन विधीसंघर्षित बालकांना दुचाकी देऊन पैसे देण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी हे अवशेष कोठला बसस्थानकाजवळ रोडच्या कडेला फेकल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोहेकॉ शाहीद शेख, पोहेकॉ फुरखान शेख, पोना भिमराज खर्से, पोकॉ सतिष भवर, पोकॉ योगेश कडले, पोकॉ प्रशांत राठोड, मपोहेकॉ/ भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ छाया माळी यांनी बजावली आहे.
राज्यात एकाच महिन्यात दोन घटना
राज्यातील महायुती सरकारने गोहत्या बंदी कायदा आणला आहे. मात्र तरीही राजरोसपणे वारंवार गोहत्या होत आहेत. गणेशउत्सवात जालना शहरात रस्त्यावर गोमांस फेकल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर देखील राज्यातील वातावरण तापले होते. तसाच काहीसा प्रकार मंगळवारी अहिल्यानगर शहरात घडला. एकाच महिन्यात काही दिवसाच्या अंतरावरच अशा घटना घडल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हप्तेखोरीमुळे पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील हिदुत्वादी संघटना करत आहेत.
आयुक्त, पोलिसांकडून कत्तलखान्यांची पाहणी
महापालिका हद्दीतील कोठला व कुरेशी मोहल्ल्यात आयुक्त यशवंत डांगे व कोतवाली पोलिसांनी अवैध कत्तलखान्यांची पाहणी केली. दरम्यान आयुक्त डांगे यांनी शहरातील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करणार असल्याची यावेळी माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी कोठला स्टॅण्ड परिसरात काही इसमांनी गोवंशीय जनावरांचे गोमांस रस्त्याच्या कडेला टाकल्याचे निदर्शनास आले. याप्रकारावरुन हिंदुत्ववादी संघटना व आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेत कोठला स्टॅण्ड परिसरात दोन तास रस्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान महापालिका व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार संग्राम जगताप यांच्या इशाऱ्यानुसार महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने कोठला व कुरेशी मोहोल्ला परिसरातील अवैध कत्तलखान्यांची पाहणी केली. महापालिका प्रशासनाने अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर चालविले जाणार असल्याचे यावेळी आयुक्त डांगे यांनी सांगितले. महापालिका व पोलिसांच्या संयुक्तपणे केलेल्या पाहणीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.