अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मतदारांशी थेट संवाद साधण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशनात मांडले गेलेले प्रश्न, कामकाज यांचा सविस्तर लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्याचा अभिनव उपक्रम आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरू केला आहे. प्रत्येक अधिवेशनाच्या सुमारे महिनाभर आधी ते मतदारांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या, सूचना ऐकतात आणि त्या विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न करतात. अधिवेशनानंतर सभागृहातील कामाचा लेखाजोखा समाजमाध्यमांच्या माध्यमातून ते मतदारांसमोर मांडतात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांनी स्पर्धा परीक्षा, शिक्षकांचे वेतन, नियुक्त्या, रखडलेल्या मान्यता, बेरोजगारी यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यांचा प्रयत्न केवळ विधिमंडळात प्रश्न विचारून थांबण्याचा नसतो. अधिवेशनानंतर संबंधित विषयांचा प्रशासनाकडून पाठपुरावा करणे, उपाययोजना व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणे, हेही ते तितक्याच जबाबदारीने करतात.
त्याचबरोबर नाशिक-पुणे द्रुतगती महामार्ग, नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे, संगमनेर व पारनेर औद्योगिक वसाहत यांसारखे अनेक मुद्दे आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात उपस्थितीत केले.
आ. तांबे यांनी मतदारांना देखील आपल्या लोकप्रतिनिधीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आणि प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आहे. विधिमंडळातील वाद, गदारोळ टाळून केवळ जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रभावीपणे प्रश्न मांडण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. या संवादात्मक आणि पारदर्शक उपक्रमामुळे लोकशाहीतील जनतेच्या सहभागाचे महत्व अधोरेखित होते.
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आ. तांबे यांनी पुन्हा एकदा मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपले प्रश्न, अडचणी आणि सूचना समाजमाध्यमांद्वारे पाठवाव्यात. त्यानंतर या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील कराला विरोध, सरकारकडून कर मागे
एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार ई-वाहनांच्या प्रचारावर जोर देत असताना ३० लाखांवरील वाहनांवर सहा टक्के कर लावणे हे धोरणाशी विसंगत असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी नमूद करत या कराला ठाम विरोध केला. त्यावर, हा कर मागे घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले
आ. सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात मांडलेले प्रश्न
– तारांकित प्रश्न ७१ – स्वीकृत ६२
– लक्षवेधी सूचना २३ – स्वीकृत ५
– सर्वसाधारण अर्धा तास चर्चा १० – स्वीकृत ४
– प्रश्नावरून उद्भवलेली अर्धा तास चर्चा 3 – स्वीकृत २
– अशासकीय ठराव ५ – स्वीकृत ३
– औचित्याचे मुद्दे १५ – स्वीकृत ९
– विशेष उल्लेख १५- स्वीकृत ९
– अल्पकालीन चर्चा ४- स्वीकृत १