Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. मागील वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आढाव दांपत्याची निर्घूण हत्या झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात वकीलबांधवांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वकील बांधवांच्या संरक्षणार्थ प्रश्न मांडताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मागील वर्षी ॲड. राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील दांपत्याची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी वकिलांचा सुरक्षेचा प्रश्न राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.
त्यावेळीही 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षण बाबत कायदा तातडीने लागू करावा, याबाबत आवाज उठवला होता. मात्र, हा कायदा प्रलंबित राहिला. त्यानंतर 2 जुलै 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला.
ही घटना अत्यंत गंभीर असून यामुळे वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बिहार, झारखंड सारख्या राज्यांनी वकिलांसाठी संरक्षण कायदा केला असून पुरोगामी महाराष्ट्र मात्र अद्यापही या कायद्याबाबत दुर्लक्षित आहे. त्यामुळे गृहमंत्री व विधी मंत्री यांच्याकडे मागणी आहे की या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
तसेच राज्यभरातील वकिलांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी याबाबत सरकारला निवेदन करण्याची सूचना केली. सरकारकडून आमदार तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नावरून या संरक्षणाच्या कायद्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.