मुंबई । नगर सहयाद्री
वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात असलेल्या कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. निष्कृष्ट आणि खराब जेवण दिल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
आकाशवाणी आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला.
डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल? असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.