अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी विधानांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच अहिल्यानगर येथे झालेल्या सभेला संबोधित करताना संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदूकडून करा, असे विधान केले होते. या विधानानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली.
त्यांनी केलेल्या या विधानाची दखल पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली. यावर बोलताना अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. कालच मुबंईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, बडे नेते आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर संग्राम जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी नाव न घेता संग्राम जगताप यांचे कान टोचले असल्याचे सांगितले जात आहे. बैठक संपल्यानंतर संग्राम जगताप बाहेर आले, त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न अनेक केले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पक्षाने धाडलेल्या नोटिशीचा होता.
मला पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीवर आज नेतेमंडळींमध्ये चर्चा झाली आहे. अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आमची अंतर्गत चर्चा झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पण या प्रकरणावर जास्त बोलणे त्यांनी टाळले. हा पक्षाचा मेळावा होता. या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आढावा घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्रात आहेच, त्यापेक्षा वेगळं काही नाही. सगळेच मानतात. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणेच कामकाज सुरू आहे. अजित पवार आम्हाला कानमंत्र आणि सूचना बऱ्याच वर्षांपासून देत आले आहेत. त्यांची भूमिका आम्ही लक्षात घेतली आहे, असे संग्राम जगताप यांनी सांगितले.
पहिल्यांदा आमदार झाल्यापासून भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा चालू
खरंतर आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूत्वाची भूमिका घेतली असल्याची चर्चा त्यांनी केलेल्या विधानावरून होत आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर संग्राम जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असा कुठलाही संबंध जोडण्याची चर्चा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा घटनेला राजकारणाशी जोडू नये. मी पहिल्यांदा आमदार झाल्यापासून अशा चर्चा येत असतात, असे भाष्य त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या प्रश्नावर केले.