१० वर्षांत नागरिकांना अपेक्षित असलेला विकास केला : महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप / भाऊबीजेला प्रभाग १४ मध्ये लाडक्या बहिणींनी केले आ.जगताप यांचे उत्स्फूर्त स्वागत
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीत मला सर्व भागांमध्ये मतदार बंधूभगीणींचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारा फेरीत भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणींनी केलेल्या औक्षणामुळे मी भारावून गेलो आहे. या सर्व बहिणींना विकसित मेट्रोसिटीची ओवाळणी देण्याची जबाबदारी माझी असून यासाठी मी कटीबद्ध आहे. गेल्या १० वर्षांच्या प्रयत्नातून शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास मी करू शकलो. आता आपल्या नगरला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. यासाठी मला पुन्हा एकदा सर्व मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा प्रचारफेरी रविवारी प्रभाग १४ मध्ये काढण्यात आली. रविवारी भाऊबिज असल्याने या परिसरात घरोघरी फुलांच्या पायघड्यांनी व रांगोळ्या रेखाटून आ.संग्राम जगताप यांचे औक्षण करून महिला भगीनींनी स्वागत केले. तसेच भोसले आखाडा भागात माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने ७ जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून भलामोठा पुष्पहाराने उमेदवार आ.संग्राम जगताप यांचा सत्कार करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संजय चव्हाण, विपुल शेटिया, संगीता भोसले आदींसह मोठ्या संख्यने परिसरातील नागरिक उपस्थितीत होते.
गणेश भोसले म्हणाले, नगर शहराच्या इतिहासात गेल्या ५० वर्षात कधीही न झालेली विकासकामे गेल्या १० वर्षात आ.संग्राम जगताप यांनी करून दाखवली आहेत. आ.संग्राम जगताप यांनी सततच्या प्रयत्नातून विकासगंगा नगरला आणली आहे. प्रभाग १४ भागातील भोसले आखाडा, सौरभ कॉलनी, जहागीरदार चाळ, बुरूडगाव रोड, पवार चाळ, अभिनव कॉलनी अशा सर्वच भागांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आ.संग्राम जगताप यांनी देवून परिसराचा कायापालट केला आहे. या भागात सुरु केलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाऊन्टन मुळे परीसारचे वैभव वाढले आहे. गोरगरीब व गरजूंना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी २७ कोटी रुपयांचे अद्यवत हॉस्पिटल पूर्णत्वास येत आहे. या परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी समर्थनगर व शांतीनगर भागात पाण्याची उंच टाकी उभारून पाणीपुरवठ्यास सुरवात झाली आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी व नवीन खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स प्रगतीपथावर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह, महिलांसाठी योगा हॉल, सर्व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून प्रभाग १४ चा सर्वांगीण विकास आ.जगताप यांच्या सहकार्यातून झाला आहे.