बाजारपेठेत दिवसभर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पोलिस प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यावर अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली. पोलिस प्रशासनानेही महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्वतः बाजारपेठेत जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेचे पथक पाहताच अतिक्रमण धारकांनी पळ काढला. बाजारपेठेतील रस्ते रिकामे करण्यात आल्यानंतर दुकानदारांनी महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तंबी देऊन दुकानाबाहेर साहित्य न ठेवण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर अतिक्रमण केल्यास हातगाडी विक्रेते असो वा फेरीवाले किंवा दुकानदार असो त्यांचे साहित्य तत्काळ जप्त करण्यात येईल. दंड भरूनही हे साहित्य पुन्हा दिले जाणार नाही, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे बाजारपेठेत लक्ष ठेवण्यासाठी व अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमणे करू नये, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बजावले आहे.
दरम्यान, आनंद धाम ते एलआयसी रोड पर्यंत रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या ज्यूस सेंटरच्या गाड्या, रसवंतीच्या हातगाड्या महानगरपालिकेकडून हटवण्यात आल्या. ज्यूस सेंटरच्या दोन टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण विभाग प्रमुख श्री आदित्य बल्लाळ, सुरेश इथापे यांच्या सूचनेनुसार माळीवाडा व बुरुडगाव रोड प्रभाग समिती कार्यालयाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे, अमोल कोतकर, अनिल आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.