कर्जत । नगर सहयाद्री:-
अविश्वास ठरावाआधीच कर्जातच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी सभापती राम शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, कर्जत नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. काँग्रेसचे तीन नगरसेवक देखील रोहित पवार यांच्या विरोधात गेले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला आहे. उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार, दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी आज अकरा वाजता विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच उषा राऊत यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा सोपवल्यामुळे या घटनेचे गांभीर्यच संपल्याचे बोलले जात आहे.
कर्जत नगरपंचायत आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात आहे. त्यांना धक्का देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तब्बल आठ नगरसेवक फोडले होते. नव्या कायद्यासाठी शिंदे यांनीच पाठपुरावा केला आहे. त्यानुसार कर्जतच्या नगराध्यक्ष राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी 11 नगरसेवकांसह भाजपाच्या 2 अशा 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
नगरसेवकांना पैशाचं आमिष
उषा राऊत म्हणाल्या की, कर्जत नगरपंचायतीत नगराध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमच्या गटातील नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवून आणि सत्तेचा प्रभाव टाकून अविश्वास ठराव सादर केला. नगरसेवकांनी पहिला अविश्वास ठराव माझ्यावर दाखल केला, त्या अविश्वास ठरावात मी कुठेच अपात्र ठरले नाही.
माझा राजकीय बळी; उषा राऊत
माझ्या कामात मी कुठेही दोषी आढळले नाही. हे जेव्हा सभापती राम शिंदे यांना लक्षात आले तेव्हा एका ओबीसी महिला नगराध्यक्षाला हटवण्याकरता सभापती राम शिंदे यांनी सत्तेचा गैरवापर केला. माझ्याविरोधात दुसऱ्यांदा नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला. यानंतर मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून एका ओबीसी महिला नगराध्यक्षाचा राजीनामा घेऊन माझा राजकीय बळी देण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोप नगराध्यक्ष उषा राऊत यांनी केला आहे.