अहमदनगर। नगर सहयाद्री
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागणार आहे. आमदार लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सध्या आ. निलेश लंके हे खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत, पक्ष फुटीच्यावेळी लंके अजितदादांसोबत गेले. तर नगरची जागा भाजपच्या वाट्याला आहे. येथे बदल होण्याची शक्यता धूसर असल्याने लंके पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
आज सकाळी अचानक या चर्चांनी अधिक वेग पकडला. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागणार असून आमदार लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आमदार लंके म्हणाले, माझ्या प्रवेशाच्या अफवा आहेत. प्रवेश असता तर कार्यकर्त्यांसोबत आलो असतो, कोणीतरी अफवा पसरवत आहे. मला माझ्या नेतृत्वाने सांगितलं तर नगरच्या जागांसाठी काम करेल.
पक्षप्रवेशाविषयी अजून काहीच नाही. माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे. स्पर्धा असो किंवा नसो स्पर्धेची तयारी करत असतो. मी खेळ खेळणारा माणूस आहे असेही ते म्हणले.