सुपा | नगर सह्याद्री
पारनेर मतदारसंघातील श्री भैरवनाथ देवस्थान, ( जातेगाव ) येथे विविध विकासकामांसाठी शासनाकडून 1 कोटी 54 लाख 78 हजार 620 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ‘ब वर्ग’ अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांची प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले असून, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निधीमुळे यात्रास्थळाचे स्वरूप बदलणार असून, जातेगावसह तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडेल. असा विश्वास आ. काशिनाथ दाते यांनी व्यक्त केला आहे.
मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये कीर्तन हॉल बांधकाम करणे (64 लाख 26 हजार 451 रुपये), भक्तनिवास बांधकाम करणे – ( 57 लाख 72 हजार 997 रुपये ), सभामंडप बांधकाम करणे – ( 11 लाख 34 हजार 207 रुपये ), किचनचे बांधकाम करणे – ( 21 लाख 44 हजार,965 रुपये ) या चार महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांमुळे मंदिर परिसर अधिक सुसज्ज, स्वच्छ, आणि भाविकांसाठी सोयीस्कर होणार आहे. विशेषतः यात्रेच्या काळात वाढलेली गद लक्षात घेता भक्तनिवास, सभामंडप आणि कीर्तन हॉल यांची नितांत आवश्यकता होती अशी प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होता आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार
आ. काशिनाथ दाते सरांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला. आम्ही ट्रस्टतर्फे महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांसाठी उत्तम सुविधा निर्माण केली जाणार आहे.
– सुरेश बोरुडे, विश्वस्त, श्री. भैरवनाथ मंदिर ट्रस्ट