पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील विधान मंडळाच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाल्याने पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर आली असल्याचे दिसत आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार दाते यांनी केलेल्या मागणीवरून जलसंपदा अधिकारी यांच्या उपस्थितीत बोलाविलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता चोपडे, तसेच अधीक्षक अभियंता अलका अहीरराव आदी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार दाते यांनी पारनेर तालुयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांचा मुद्देसूद पाठपुरावा केला. त्यामध्ये कुकडी डावा कालवा अस्तरीकरण कामे, पिंपळगाव जोगा कालवा दुरुस्ती, उर्वरित पारनेर हद्दीतील कालवा अस्तरीकरण, शिव डोह जोड कालवा कामासाठी निविदा प्रक्रिया व वितरिका दुरुस्ती यांचा समावेश होता. तसेच हंगा पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या दुरुस्तीबाबत आणि पठार भागावरील चार लिफ्ट योजनांचे सर्वेक्षणासंदर्भात पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेला जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, त्या अनुषंगाने लवकरच संबंधित प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया व दुरुस्तीच्या कामांना गती मिळणार असल्याचे संकेत मिळाले असुन संबंधित मागण्यांच्या पुर्णत्वावर पारनेरच्या अर्थकारणाची व समाजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे .
कोरडवाहू भाग ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न
पारनेर तालुयाच्या शेतकर्यांसाठी आणि जलसंपत्ती विकासासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने सततच्या पाठपुराव्यामुळे तालुयातील जलसिंचन सुविधा सुधारण्यासाठी व तालुयातील बहुतांशी कोरडवाहू असलेला भाग ओलिताखाली आणण्यासाठी शासनस्तरावर गंभीर पावलं उचलली जात आहेत.
– आ. काशिनाथ दाते
‘या’ मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा
बैठकीदरम्यान कुकडी डावा कालवा अस्तरीकरण कामे, पिंपळगाव जोगा कालवा दुरुस्ती, उर्वरित पारनेर हद्दीतील कालवा अस्तरीकरण, शिव डोह जोड कालवा कामासाठी निविदा प्रक्रिया व वितरिका दुरुस्ती आदींबाबत चर्चा झाली. तसेच हंगा पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या दुरुस्तीबाबत आणि पठार भागावरील चार लिफ्ट योजनांचे सर्वेक्षणासंदर्भात पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.