पारनेर । नगर सहयाद्री
आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ३) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने पुन्हा एकदा जबर फटका दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असे निर्देश आमदार काशिनाथ दाते सर यांनी तहसीलदार उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिले आहे.
पारनेर तालुक्यातील वनकुटे , काकणेवाडी, नारायण गव्हाण, यादव वाडी, मावळेवाडी, वाडेगव्हाण, कुरुंद, पाडळी रांजणगाव, तास या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून यामध्ये कांदा, मका, मिरची ,कलिंगड, टोमॅटो, झेंडू, डाळिंब, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जो काही शेतीमाल शेतकऱ्यांच्या हातात आला त्या मालाला भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
परंतु निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर सूड उगवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळीवारा, चक्रीवादळ यामुळे रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस चक्रीवादळ आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामांकडून असलेल्या अपेक्षांवर पाणी फेरले.
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या
पारनेर तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस चक्रीवादळ व ढगाळ वातावरणामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
-आमदार, काशिनाथ दाते