निघोज । नगर सहयाद्री:-
कुकडीच्या डाव्या कालव्याला आवर्तन सोडल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आ. काशिनाथ दाते यांनी शब्द पाळल्याने शेतकऱ्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
कुकडी डावा कालवा लाभधारक परिसरात कांदा पिकाची लागवड सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती.
आमदार दाते यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबईत भेट घेऊन कुकडी डावा कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी केली.
संबधीतांनी लगेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत पाणी सोडण्याची सुचना केली होती. बरोबर दि.१० रोजी पाणी सोडण्यात आले असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.