अहिल्यानगर | नगर सह्याद्री
लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा गुलाल उधळला गेला. तेव्हा ही हिरवी वळवळ जर थांबवायची असेल तर आपणास एकत्र रहावे लागेल. धर्माच्या माध्यमातून एक राहावे लागेल म्हणून विधानसभेत भगवा ध्वजाच्या खाली आपण सर्व एकत्र आलो व विजय संपादन केला, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल सारसनगर परिसराच्या वतीने त्यांचा भगवानबाबा मंदिर, संत श्री भगवानबाबानगर, सारसनगर, अहिल्यानगर येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब मुंडे, भीमराव महाराज दराडे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, झुंबरराव आव्हाड, भीमराव आव्हाड, म्हातारदेव घुले, अमोल महाराज जाधव, मंदिराचे अध्यक्ष बबन घुले, अशोक दहीफळे, दत्ता जाधव सर्व विश्वस्त पदाधिकारी भक्तमंडळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार जगताप यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आला. आमदार जगताप म्हणाले, या ठिकाणी अनेक मान्यवर येऊन गेलेले आहे. येथे अध्यात्म व धर्माची एकजूट आहे. गेली 18 वर्षे येथे ग्रामीण भागातून आलेला ऊसतोड कामगार राहत आहे. तो आपल्या मातीशी व धर्माशी जोडला गेला आहे. आज येथील मुले उच्च पदावर गेली आहेत. आज या सारसनगर परिसरात पाहिले तर सर्व रोड काँक्रिटचे झालेले आहेत व विकासकामे हि मोठ्या प्रमाणात झाली आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठानचे विश्वस्त व सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेकांनी वैयक्तिकरीत्या आमदार जगताप यांचा सत्कार केला.