पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे गावागावांत निर्माण होऊ पाहणारे जाळे आणि पारनेर मतदारसंघातील वाळुंबा नदीला आलेल्या पूरस्थितीत पोलिसांनी दाखविलेली तत्परता या मुद्द्यांवर विधानसभेत आमदार काशिनाथ दाते यांनी जोरदार भाष्य करत सरकारचे लक्ष वेधले.
पुरवणी मागणी चर्चेदरम्यान गृह विभागावर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पारनेर तालुक्यात काही भागांमध्ये अगदी पानांच्या टपऱ्यांवरसुद्धा अमली पदार्थांची विक्री सुरू असून, युवकांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यासोबतच टाकळी ढोकेश्वर येथे नवीन पोलिस ठाणे अद्यावत इमारतीसह तिथे लागणारे कर्मचारी नियुक्त होऊन पोलिस स्टेशन तात्काळ सुरू करण्याची ठाम मागणी आ.दाते यांनी केली.
तसेच या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप, कनेक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल तसेच शेळ्या, मेंढ्यांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असून या भागाचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि सध्या टाकळी ढोकेश्वर बीटमध्ये उपलब्ध असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे ठाणे कार्यरत होणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यांच्या या ठाम आणि मुद्देसूद मागण्यांनी पारनेर तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी घेतलेली भूमिका अधोरेखित होत असून आमदार काशिनाथ दाते यांनी या संपूर्ण पावसाळी अधिवेशनातच मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पावसामुळे अलीकडेच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील खडकी, खंडाळा या भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आठ नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले होते. पुराच्या रौद्रतेमुळे सगळेच भयभीत झालेले असताना एपीआय प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवले, त्यांच्या या धाडसाचे कौतुक होऊन, सरकारी पातळीवर त्यांचा गौरव करण्यात यावा.
– आमदार काशिनाथ दाते