मांडओहळ धरणाचे जलपूजन; धरण भरल्याने शेतकरी आनंदी
पारनेर । नगर सहयाद्री
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तांबडीकार, निमदरी, भोरवाडी यांसारखे महत्वाचे जलसाठा प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार काशिनाथ दाते यांनी दिले. पारनेर तालुक्याला वरदान ठरलेला मांडओहळ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते र यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अॅड. बाबासाहेब खिलारी, नगरसेवक युवराज पठारे, अशोक चेडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, रिपाई तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, राष्ट्रवादी पारनेर कार्याध्यक्ष पंढरीनाथ उंडे, प्रगतिशील शेतकरी विकास रोकडे, माजी उपसरपंच परसराम शेलार, सरपंच सुनिता मुळे, सुधामती कवाद, जयश्री शिंदे, संजीवनी आंधळे अक्षय गोरडे, अमोल रोकडे, शिवाजी खिलारी, देवराम ठुबे, साहेबराव वाफारे, अनंता शिर्के, विकी दाते, दत्तानाना पवार, सुनील तांबोळी, बाळशिराम शिंदे, अविनाश शेलार, विठ्ठल कवाद, राहुल घुले, विकास पवार, सुभाष ठाणगे, विकास शिवले, अशोक खैरे, निलेश पवार, प्रकाश चौधरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दाते म्हणाले की, मांडओहळ धरणात एकूण ३९९ दशलक्ष घनफूट साठा असून ३१० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. या धरणावरून टाकळी ढोकेश्वर ते कान्हूर पठार पर्यंतच्या १६ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. धरणाच्या पाण्याचा उपयोग खडकवाडी, पळशी, वासुंदे परिसरातील शेतीला दिलासा देणारा ठरणार आहे. तसेच मांडओहळ धरणावरील कॅनॉलच्या लाइनिंगचा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सोडवणार असल्याचे सांगितले.
मांडओहळ धरणाची उंची वाढवा: अॅड. खिलारी
तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीला वरदान ठरलेला मांडओहळ प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. वाढत्या सिंचन गरजा आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, या धरणाची भिंत २ मीटरने उंच करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अॅड. बाबासाहेब खिलारी यांनी आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन दिले आहे.
पर्यटन विकासाला चालना देणार: आ. दाते
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील मांडओहळ प्रकल्प हा केवळ सिंचनासाठी नव्हे तर पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विशेष पाठपुरावा केला जाणार असल्याचे विधान आमदार काशिनाथ दाते यांनी केले. मांडओहळ प्रकल्प हा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने, वनविभागाच्या अटी व शर्तींचा विचार करून नियोजन करण्यात येणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरू शकतो, असे आमदार दाते म्हणाले.