संगमनेर । नगर सहयाद्री
भोजापूर चारी आणि पाण्याच्या मुद्द्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली राजकीय टीका म्हणजे अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड आहे. 40 वर्षे सत्तेत असताना ज्यांना तळेगाव, निमोण आणि पठारभागातील जनतेला पाणी देता आले नाही त्यांना महायुती सरकारने आठ महिन्यांत भोजापूर चारीसाठी केलेल्या कामावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळू न देता त्यांच्या भावनांशी खेळलात म्हणूनच जनतेने तुम्हाला सुध्दा घरी बसवले. काम करणार्यांवर टीका करण्यापेक्षा केलेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करा, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी थोरातांच्या पत्रकबाजीचा समाचार घेतला.
आमदार खताळ पुढे म्हणाले, मला निवडून येवून आठ महिने झाले. तरी मी राज्य सरकारकडे काही ना काही पाठपुरावा करून भोजापूर चारीसह तालुक्यातील अन्य काही प्रश्न मार्गी लावत आहे. मग तुम्हाला जनतेने चाळीस वर्षे संधी दिली, तुम्हाला भोजापूर चारीला पाणी देता का आले नाही? निसर्गाने साथ दिली म्हणून भोजापूरला पाणी आले असे तुमचे म्हणणे असेल तर चाळीस वर्षात पाऊस झालाच नाही का? भोजापूर धरण भरले नाही का? चार्यांची काम करण्याचा केवळ राजकीय फार्स केला का? याची उत्तरे आधी फसवलेल्या जनतेला माजी आमदार थोरातांनी द्यायला हवीत.
केवळ स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी दुष्काळी पट्ट्यातील जनतेला तहानलेले ठेवून त्यांचे शोषण करणे आणि मतांसाठी राजकारण करणे हाच तुमचा चाळीस वर्षांचा अजेंडा होता. नुसत्या चारी खोदून पाणी येत नाही, त्यासाठी प्रामाणिक नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती लागते, जी तुमच्याकडे कधीच नव्हती. गेल्या आठ महिन्यांत आम्ही भोजापूर चारीच्या दुरुस्तीसाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी अथक परिश्रम घेतले. मे-जूनच्या पावसाने धरण भरले, पण त्याला आमच्या नियोजनाची आणि जलसंधारण विभागाशी समन्वयाची जोड होती.
आम्ही निधी मंजूर करून चारीच्या दुरुस्तीला गती दिली, स्थानिक यंत्रणांसह काम केले आणि पाणी निमोण, पारेगाव, तळेगाव, तिगाव, वडझरी या गावांपर्यंत पोहोचवले. तुम्हाला खरंच लोकांविषयी तळमळ होती, त्यांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा होती, तर 40 वर्षे का काम केले नाही? तुम्ही फक्त ठराविक लोकांची, तुमच्या बगलबच्च्यांची प्रगती केली, हे कटू सत्य संगमनेरकर जाणतात. तुम्हांला वाटत असेल की तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आता उघडे पडला आहात. संगमनेरकरांची काळजी आहे असे दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी संगमनेरकरांनी तुम्हाला चांगलेच ओळखले होते. त्यामुळे सूज्ञ जनतेची फार दिशाभूल तुम्ही आता करू शकणार नाही. तळेगाव निमोणच काय पठारभागातील प्रत्येक गावाला पाणी मिळेपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले.
भोजापूर चारी आणि निळवंडे धरणाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. तुमच्या खोट्या भूलथापांना आणि बनावट श्रेय घेण्याच्या खेळाला आता जनता बळी पडणार नाही. आमच्या कामाचे परिणाम जनतेसमोर आहेत आणि सत्य कधीच लपत नाही. तुमच्या खोट्या टीकेला जनताच उत्तर देईल, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.