Politics News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकताच पार पडली आहे. यात सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने विजय मिळविला असून बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया नुकताच पार पडली आहे.
या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. अर्थात आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्याशी केलेली हातमिळवणी फायद्याची ठरली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री. सिद्धेश्वर विकास पॅनलने निवडणुकीत १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती. या लढतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता. यात निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील ११ पैकी ११ जागांवर कल्याणशेट्टी पॅनलचे एकहाती वर्चस्व मिळालं होतं. त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार? याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती.
भाजपाची काँग्रेससोबत युती?
दरम्यान श्री. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय मिळविल्यानंतर आज सभापती व उपसभापती पद निवडीसाठीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांची सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.