अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ चौकशीच्या सूचना केल्या आहेत. शल्यचिकित्सकांनी जिल्हा त्रिसदस्यीय समितीला तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अहवाल आरोग्य उपसंचालक तसेच आयुक्तांना पाठविला जाणार आहे.
चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पुढे आली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनावर आरोप झाले. यामध्ये रुग्णांना बांधले, प्यायला पाणी दिले नाही,उपचारात हलगजपणा केला, यावरून रुग्णालय प्रशासनाला नातेवाईकांसह सामाजिक संघटनांनीही धारेवर धरल्याचे दिसले. यासंदर्भातजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. शिवशंकर वलांडे व डॉ. दर्शना बारवकर अशी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली.
या समितीला सात दिवसांचा कालावधी दिला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. नेमके मृत्यू का झाले, त्यात कोणाचा दोष आहे का, असेल तर कारवाई झाली पाहिजे, याकरिता या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना सूचना केल्या आहे. तसेच त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांना तसे आदेश दिले आहे.
खासदार लंके यांचे जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र
जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरुंच्या झालेल्या मृत्यूमुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र दिले असून सीसीटीव्ही फुटेज व भिक्षेकरूंवर उपचार केलेले आयपीडी पेपर ची मागणी केली आहे. जिल्हा रुग्णालयात 4 भिक्षेकरू उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी वॉर्डमधील सीसीटीव्ही फुटेज, बेघर वॉर्डच्या आतील, बाहेरील फुटेज, भिक्षेकरुंना ठेवण्यात आलेल्या, उपचार केलेल्या वॉर्डचे सीसीटीव्ही फुटेज, भिक्षेकरुंवर केलेल्या उपचाराचा तपशील याची मागणी केली आहे. यामध्ये काही संशयित आढळल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे निष्पक्ष चौकशीची मागणी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे.