लोणी / नगर सह्याद्री –
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे राष्ट्रीय स्मारक, श्रीक्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी जिरायती भागाला मिळवून देण्याच्या योजनेला गती देवून जिल्ह्याला दिलासा देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
ना.विखे पाटील यांच्यासह आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेवून जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्पांच्या संदर्भात चर्चा केली. ना.विखे पाटील यांनी मांडलेल्या प्रश्नांना तसेच जिल्ह्याच्या विकासात्मक बाबींना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
मागील युती सरकारच्या काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन औैद्योगिक वसाहतींना जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात औद्योगिक विकासाला पुरक असे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्याचा विकास आराखडाही तयार करण्यात आला असून, जिल्ह्यात उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्यास जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करुन देण्याच्या दृष्टीने मोठी मदत होईल याकडे ना.विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाचे हे त्रिशताब्दी वर्ष असून, या निमित्ताने अहिल्यानगर शहरात अहिल्यादेवी होळकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे यापुर्वीच सादर करण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर हे स्मारक उभे करण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला असून, महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी उपयुक्त ठरणा-या या राष्ट्रीय स्मारकास निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती ना.विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ना.फडणवीस यांना केली आहे.
श्रीक्षेत्र नेवासे येथे ज्ञानेश्वर सृष्टी उभारुन जिल्ह्याचा आध्यात्मिक वारसा जागतीक पातळीवर पोहोचविण्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन, नव्या पिढीलाही या तिर्थस्थानाची ओळख व्हावी यासाठी या परिपुर्ण अशा सोयी सुविधांनी तिर्थक्षेत्र पर्यटन केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करण्याबाबतही या भेटीत चर्चा झाली असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्या सहकार्यानेच मार्गी लागले आहे. उर्वरित कामांसाठीही निधीची उपलब्धता व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असून, शंभर वर्षांहून अधिक कालावधी पुर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या नुतणीकरणासाठी आपल्या माध्यमातून १९० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीची उपलब्धता तातडीने झाल्यास गोदावरी लाभक्षेत्रातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी त्याची मोठी मदत होईल.
सरकारने महत्वकांक्षी असा नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे, या माध्यमातून पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागात येण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पाला अधिकची गती मिळाल्यास दुष्काळी पट्ट्याला याचा मोठा दिलासा मिळेल या दृष्टीनेही तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.