अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
राज्य सरकारने दुध अनुदान योजना सुरू करून अडचणीत आलेल्या दुध व्यवसायाला उर्जितावस्था मिळवुन द्यावी अशी मागणी आज आमदार शिवाजी कर्डिले यांनी दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना भेटून केली आहे.
याबाबत कर्डिले यांनी सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला अनुदान योजना दिलेली आहे. तसेच या योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर वर्ग होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला चांगला हातभार लागला आहे. परंतु डिसेंबर 2024 पासून योजनेची काहीही सुचना किंवा नोटिफिकेशन आलेले नाही.
आजही बाजारपठेमेध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला 28 रु. (3.5/8.5) प्रति लिटर इतका दर मिळत आहे की जो उत्पादन खर्चापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे दूध अनुदान योजना ही बाजारपेठेमध्ये दुधाचे दर वाढेपर्यंत सुरु ठेवावी. तसे न झाल्यास शेतकऱ्यांचा दुध व्यवसाय पुर्णपणे अडचणीत येईल यामुळे या योजनेला मुदतवाढ मिळावी आणि योजना पुर्ववत चालू ठेवावी अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.