मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात सातत्याने हवामान बदल घडतांना दिसत आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती तर मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच आता पुन्हा राज्यावर दुहेरी संकट निर्माण झाले असून मुंबईकर घामाघूम होणार तर नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत मात्र उकाडा कायम राहणार असून मुबईकर घामाघूम होणार आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाटसदृश वातावरणाचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
तसेच नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. नगर आणि नाशिकमध्ये गारपीट तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. जळगाव, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, धाराशिव, लातूर, धुळे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
मान्सून ३१ मे रोजी केरळात पोहोचणार
भारतीय हवामान खात्याने बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षी मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शयता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की, हे लवकर नाही. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख १ जून असल्याने ही सामान्य तारखेच्या जवळपास आहे. आयएमडी डेटानुसार, केरळमध्ये मान्सूनच्या सुरुवातीची तारीख गेल्या १५० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे, राज्यात मान्सूनची सर्वात पहिली सुरुवात ११ मे १९१८ रोजी झाली होती.