मुंबई। नगर सहयाद्री: –
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमोर महायुतीची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत.
अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एक तर तू राहशील किंवा मी तरी राहीन’, अशा शब्दांत निर्वाणीचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला घाम फोडला. आता विधानसभा निवडणुकीत उरलीसुरली गुर्मी उतरवणार आहोत. राजकारणात एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन.” उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ठाकरे म्हणाले, “काही जण सरकार पाडण्याची सुपारी घेऊन, आता दिल्लीश्वरांचे बूट चाटण्याचं काम करत आहेत. विधानसभेला त्यांचाही बंदोबस्त करू.” या वक्तव्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत दिलेल्या इशाऱ्याला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस शेरोशायरी करताना दिसत आहे. त्यामध्ये “मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले ही कई फसानो का रुख मोड़ चुका हूँ मैं!” असे म्हणतांना देवेंद्र फडणवीस दिसत आहे.