अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने सन 2024-25 या वर्षासाठीच्या ’सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेने (शेड्युल्ड बँक) 1001 कोटी ते 2500 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटामधून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.
नाशिक येथील श्री स्वामीनारायण कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या फेडरेशनच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन ज्योतिंद्र मेहता, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्ष वैशाली आवाडे आणि संचालक आमदार प्रवीण दरेकर तसेच संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने मर्चंट्स बँकेचे उपाध्यक्ष अमित मुथा, संचालक किशोर मुनोत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बॅकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बँकेस नुकताच रिझर्व्ह बँकेने श्येडूल्ड बॅकेचाही दर्जा दिला गेला आहे. अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत म्हणाले की, बॅकेच्या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीत सर्व अधिकारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार या सर्वांचाच मोठा वाटा आहे. सर्वाचा अतूट विश्वास बँकेसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. या पुरस्काराने सर्वांनाच अतिशय आनंद झाला आहे.