अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला असून अहवाल सालात बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कामगिरीबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑप.बँक्स क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नवी दिल्ली यांच्याकडून बँकेस सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी दिली. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या सभासदांना 5100 रुपयांची मुदत ठेव पावती देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
अहमदनगर मर्चंट्स बँकेची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा केशर गुलाब मंगल कार्यालय येथे बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष अमित मुथा, संचालक आनंदराम मुनोत, अनिल पोखरणा, संजय बोरा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, सीए मोहन बरमेचा, संजय चोपडा, किशोर मुनोत, कमलेश भंडारी, संजीव गांधी, सुभाष बायड, मीनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, विजय कोथिंबिरे, सुभाष भांड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजेश झंवर, पेमराज बोथरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी, कर्मचारी प्रतिनिधी जितेंद्र बोरा, प्रसाद गांधी आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
बॅकिंग अधिक सोपे, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी मर्चंट्स बँकेच्या डिजिटल बँकिंग प्रणालीतील एक पुढचे पाऊल कॉर्पोरेट बँकिंगचा शुभारंभ संस्थापक अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते झाला. याबद्दलची सविस्तर माहिती बँकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष सीए आयपी अजय मुथा यांनी सादर केली. तसेच खातेदारांसाठी आता मोबाईल बँकिंगमधील पुढचे पाउल म्हणजे मोबाईल बँकिंगमधून आरटीजीएस, एनईएफटी सेवा व बँक स्टेटमेंट टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये इंटिग्रेशन या नवीन सुविधांचाही शुभारंभ करण्यात आला.
सभासद, खातेदार, ठेवीदारांचा विश्वास आणि सर्व तत्कालीन व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने बँक उंचीवर पोहोचली आहे, असे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत म्हणाले. अनेक आव्हानांना सामोरे जात बँकेने उत्कृष्ट कारभाराची परंपरा जपली आहे. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षात सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा ठराव केला आहे. बँक लवकरच डी मॅट अकाउंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या सभासदांना 5100 रुपयांची मुदत ठेव पावती देण्यात येणार आहे. यासंदर्भात सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळवण्यात येणार आहे, अशी माहितीही हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक यांनी अहवाल वाचन केले व विषय पत्रिकेवरील विषयांची माहिती दिली. अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत पुढे म्हणाले, सन 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेला 39 कोटी 14 लाखांचा ढोबळ नफा झालेला आहे. आवश्यक तरतुदी वजा करून निव्वळ नफा सात कोटी दोन लाख रुपये इतका मिळाला. कर्जावरील व्याजात बँकेने अहवाल वर्षात 26 कोटी 86 लाख रुपये रिबेट दिला असून रिबेटच्या रकमेचे उत्पन्नाशी शेकडा प्रमाण 22.22 इतके आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिबेट देऊनही बँकेस चांगला नफा झाला आहे.
31 मार्च 2025 अखेर बँकेचे वसुल भागभांडवल 19 कोटी 22 लाख रुपये असून इतर निधी 271 कोटी 80 लाख रुपये आह. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या नफा वाटणी प्रमाणे बँकेचा राखीव निधी व इतर निधी 276 कोटी तीन लाख रुपयांचा होईल. आर्थिक वर्षअखेर बँकेचा सीआरएआर 15.73 टक्के आहे. एसएलआरमध्ये गुंतवणुक 327 कोटी 30 लाखांची आहे व मुदत ठेवी 255 कोटी 39 लाखांच्या आहेत. यावरून बँक भक्कम आर्थिक पायावर उभी असल्याचे निदर्शनास येते.
सध्या व्यापारी बँकांचा चेहरा बदलत आहे. त्यामुळे नगर मर्चंट्स बँक अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध करून देत आहे. सर्वांच्या सहकार्याने बँकेची प्रगतीची घोडदौड अशीच कायम राहील असा विश्वास अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी व्यक्त केला. यावेळी सभासद श्रीकांत मंडोरे यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना श्री. मुनोत यांनी सविस्तर उत्तर दिले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. उपाध्यक्ष अमित मुथा यांनी आभार मानले.