अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांची माहिती; 26 कोटी 87 लाखांचा रिबेट देऊनही बँकेस 39 कोटींवर ढोबळ नफा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सन 1973 साली स्थापन झालेल्या अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद घोषित झाला असून बँकेस या आर्थिक वर्षात कर्जदारांना व्याजामध्ये 26 कोटी 87 लाख रुपयांचा रिबेट देऊनही बँकेस 39 कोटी 15 लाखांचा ढोबळ तर सात कोटी तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मर्चंट्स बँकेने एनपीए वसुलीसाठी अथक प्रयत्न केलेले असून यावष बँकेने ठरविल्यानुसार नेट एनपीए शून्य टक्के करण्यास यश लाभले आहे. बँकेने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भरीव कामगिरी केल्याचे हस्तमलजी मुनोत यांनी म्हटले आहे. बँकेचे उपाध्यक्ष अमित मुथा, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. बँकेकडे गेल्या 31 मार्चअखेर 1462 कोटी 16 लाखांच्या ठेवी आहेत. मागील वर्षापेक्षा 81 कोटी 97 लाखांनी ठेवीत वाढ झाली आहे. नजरगहाण कर्ज खात्यावरील व्याजदर रिबेट वजा जाता नऊ टक्के, सोनेतारण कर्ज 25 लाखांपर्यंत आठ टक्के, वाहन कर्ज 25 लाखांपर्यंत आठ टक्के, गृहतारण कर्ज साते पावणेआठ टक्के असून ते कोणत्याही नागरी बँकेपेक्षा कमी असल्याचे ते म्हणाले.
मर्चंट्स बँकेतर्फे कोअर बँकिंग प्रणालीची सोय आहे. बँकेकडून खातेदारांना सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत. बँकेचे एकूण रिझर्व व इतर फंड 212 कोटी 50 लाखांचे होते. त्यात 59 कोटी 31 लाखांची वाढ होऊन गेल्या 31 मार्चपर्यंत रिझर्व व इतर फंड 271 कोटी 81 लाखांचे झाले आहे, असे श्री. मुनोत म्हणाले. सर्व संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बँकेला एनपीए चे प्रमाण शून्य टक्के करण्यास यश लाभले आहे, असे ते म्हणाले. भारत सरकारच्या बँकांच्या बचत ठेव खातेदारांसाठी लागू केलेल्या पंतप्रधान अपघात विमा योजना मर्चंट्स बँकेकडून राबविली जात आहे. विम्याच्या प्रीमियमची रक्कम बँके खातेदारांकडून वसूल न करता स्वत:च्या नफ्यातून भरत आहे. रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राजेश झंवर, पेमराज बोथरा, सीए प्रवीण कटारिया यांची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असेही हस्तीमलजी मुनोत म्हणाले.
मर्चंट्स बँकेचे सर्व कर्मचारी अचूक बँकिंग सेवा देत आहेत. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज या पुण्यतिथीनिमित्त बँकेतर्फे रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदा 1670 पिशव्या रक्त संकलन झाल्याचे हस्तीमलजी मुनोत म्हणाले. सभासद व सेवकांना बँकेतर्फे कल्याण निधी उभारण्यात आला आहे. तसेच कायम सेवक व त्यांच्या कुटुंबीयांची दरवष दोन लाखांची फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी बँकेतर्फे उतरविली जाते. बँकेच्या अहिल्यानगर शहरात सात, जिल्ह्यात जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्ड, सोनई येथे तसेच संभाजीनगर येथे दोन, पुणे जिल्ह्यात तीन तर बीड जिल्ह्यात एक अशा एकूण 18 शाखा कार्यरत असल्याचे हस्तीमलजी मुनोत म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष अमित मुथा, अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, मोहनलाल बरमेचा यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.