मुंबई / नगर सह्याद्री :
आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला धडकणाऱ्या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. पुढील दोन दिवस राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने विदर्भात चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. ३० तारखेपर्यंत ‘मोंथा’मुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या सणात नागरिकांचा उत्साह कोलमडला होता. आताही पुन्हा एकदा पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील काही तास पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशला रेड अलर्ट –
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. मोंथा चक्रीवादळ अतिशय वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारी भागाकडे सरकत आहे. मोंथा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशला बसला आहे. आंध्र प्रदेशमधील बहुतांश जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय समुद्रात जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशला येणाऱ्या काही ट्रेन अन् बसही रद्द् करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेश सरकारकडून चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.
१९ जिल्ह्यांना रेड अलर्ट –
मोंथा वादळामुळे उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. मोंथा चक्रीवादळ अतिशय वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारी भागाकडे सरकत आहे. मध्यरात्रीपर्यंत हे वादळ आंध्रच्या किनारी भागला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग १०० किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आंध्र प्रदेशातील १९ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. त्याशिवाय नंदयाल, कडप्पा आणि अन्नमय्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला.
वाहतुकीवर परिणाम –
मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र, तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे अन् वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४३ पेक्षा जास्त रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिक मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील अधिकाऱ्यांनी कोठापट्टनम आणि उप्पाडामध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला. झारखंडमध्येही सतर्कता कायम आहे. मोंथामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटनावर परिणाम
पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये मोंथा चक्रीवादळ धडकले आहे. कोकणातही सध्या समुद्रातले वातावरण बदललं असून जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. रात्री उशिरा किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला. सकाळपासून किनारपट्टी भागातलं वातावरण ढगाळ असून पुढील 24 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जोरदार वाऱ्यामुळे मच्छीमारी सध्या ठप्प झाली असून पर्यटनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे.



