अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे एका २५ वर्षीय तरुणाला मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर असे की, घटना १ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५:४५ वाजण्याच्या सुमारास रुईछत्तीसी येथे घडली. फिर्यादी विठ्ठल दामोदर जगदाळे (वय ५३, रा. रुईछत्तीसी, अहिल्यानगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा आकाश विठ्ठल जगदाळे (वय २५) याला आरोपी स्नेहल आकाश जगदाळे (रा. एकशिंगे चिंचोली, ता. आष्टी, जि. बीड) हिने मानसिक छळ केला.
१३ फेब्रुवारी २०२४ पासून स्नेहलने आकाशला लग्नानंतरच्या काळात पैशांसाठी त्रास दिला, त्याला सामाजिक अपमानाची धमकी दिली आणि त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली. तुझी इज्जत ठेवणार नाही, तू माझा मालक नाही असे बोलून आकाशला मानसिक त्रास दिला. ज्यामुळे त्याने १ ऑगस्ट रोजी राहत्या घरात लेडीज स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नगर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमाळ करत आहेत.