मंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला चांगला कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात आता महायुतीचं एकहाती सरकार येणार हे निश्चित झालं आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. एकीकडे राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असा गौप्यस्फोट शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
रविकांत तुपकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून फायनल होती परंतु प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांनी खेळी करून तुपकरांचे तिकीट कापले. अनिल परब आणि नार्वेकरांसोबत त्यांची बैठक झाली होती असा दावा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यावरून रविकांत तुपकरांनी चर्चेवेळी काय घडले त्याचा खुलासा केला आहे.
रविकांत तुपकर म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत जावं ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. माझं तिकीट फायनल झालं होतं ही खरी गोष्ट आहे. त्या अनुषंगाने आमच्या बैठका झाल्या. आमच्या शेवटच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, तेजस ठाकरे, विनायक राऊत, मी आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख होते.
रविकांतला तिकीट द्यायचं ठरलं, मला सांगण्यात आले, तुम्ही गावाकडे जा, कार्यकर्त्यांची बैठक घ्या त्यांच्यासमोर घोषणा करा. त्यानंतर मातोश्रीवर या, आपण संयुक्तिकपणे शेतकरी संघटनेचे आणि शिवसेनेची युती झाल्याचं जाहीर करू. एबी फॉर्म मात्र तुम्ही आमचा घ्यायचा हे ठरले. मी गावाकडे आलो आणि दुसऱ्या दिवशी मला दिलेला शब्द अचानक उद्धव ठाकरेंनी फिरवला असा गौप्यस्फोट शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.