| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद
| पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकातून वाळू तस्करी
पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील मुळा नदीपात्रातून वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, शिक्री, ठाकरवाडी, कामटवाडी, खडकवाडी, पळशी, तास आणि वनकुटे या गावांमधून रात्रीच्या अंधारात आणि दिवसाही बिनधास्तपणे वाळू तस्करी जोरात सुरू आहे. ट्रॅक्टर, डंपर आणि जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्र खणून काढले जात आहे. या बेकायदा उपशामुळे मुळा नदीपात्राला खऱ्या अर्थाने पोखरले जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला धोका निर्माण होत असताना, स्थानिक पोलीस प्रशासन आणि वन विभाग मात्र हातावर हात ठेवून मूकदर्शक बनले आहेत.
जिल्हा पोलीस प्रशासनामधील अधिकारी तसेच तालुका पोलीस प्रशासनामधील अधिकारी व गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी वर्गाच्या बदल्या होऊनही पारनेर तालुक्यामध्ये वाळू तस्करी जैसे थेच सुरू आहे. या वाळू तस्करीला नेमका कोणाचा आश्रय आहे. हे आता शोधणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा मलिदा घेऊन शांत बसले आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वसामान्य जनता विचारत आहे.
वाळू तस्करांची दादागिरी इतकी वाढली आहे की, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहने नदीपात्रात उतरतात आणि वाळूची अवैध वाहतूक करतात. यामुळे नदीपात्रात खड्डे पडले असून, शेतीसाठी पाण्याचा प्रवाह आणि भूजल पातळीवर गंभीर परिणाम होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, पण पोलिस आणि वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे तस्करांचे मनोधैर्य वाढले आहे.
नदीपात्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाची उदासीनता संशयास्पद आहे. वाळू तस्करांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा परिसरात आहे. मुळा नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असताना, प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी तातडीने कठोर कारवाई, नियमित गस्त आणि दोषींवर कडक कायदेशीर उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा मुळा नदीपात्राचे संपूर्ण विनाश अटळ आहे.
कावडे, बोरगे टोळीपासून सावधान !
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार घेताच स्थानिक गुन्हे शाखेत साफसफाईची मोहिम राबविली. तसेच विशेष पथक स्थापन करुन जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली. आता पुन्हा नव्याने स्थानिक गुन्हे शाखेत टीम तयार केली जाणार आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेत जाण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. पारनेर, निघोज परिसरात गुटखा, तंबाखू माफिया म्हणून कावडे, बोरगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी निघोज, पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. त्यांनीही स्थानिक गुन्हे शाखेसाठी फिल्डींग लावल्याची माहिती पुढे येत असून याबाबत पोलिस अधीक्षक कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील मुळा नदीपात्रातून होणाऱ्या बेसुमार वाळू तस्करी करणाऱ्या गाड्यांचे रिल्स व्हिडिओ वाळूतस्कर काढतात आणि सोशल मीडिया इंस्टाग्राम व फेसबुकवर शेअर करतात. हे व्हिडिओ पोलीस प्रशासनाला दिसत नाहीत का यामधूनच गुंडगिरी प्रवृत्ती जन्म घेत आहे. वासुंदे चौकातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून आम्ही कशा पद्धतीने वाळूच्या गाड्या नेतो हे दाखवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.
हाकेच्या अंतरावरून वाळू तस्करी
टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकातून वाळू तस्करी होते येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी गस्त घालण्याची गरज असताना वाळूतस्कर रात्रभर गस्त घालतात आणि पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरून चौकातून वाळू तस्करी होते या सर्व प्रकाराला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थ म्हणतात
रोडरोमिओंचा बंदोबस्त करा
टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये श्री. ढोकेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक व नवोदय विद्यालय तसेच इंजीनियरिंग कॉलेज आहेत. हेच वाळूतस्कर रोड रोमिओ म्हणून या परिसरात वावरतात आणि कॉलेजच्या विद्यार्थिनींना त्रास देतात याकडे पोलीस सरळ डोळे झाक करत आहेत. या सर्व सुरू असलेल्या प्रकाराला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे पालक वर्गाचे म्हणणे आहे.