दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक!
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया दुकानाच्या दुसर्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. मुरमुरा, गॅस गिझर व २०१५ ते २०२४ पर्यंतची खरेदी-विक्रीची बिले जळून खाक झाली. दुकानदार रुपेश जयप्रकाश कटारिया (वय ४३) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात खबर दाखल केली असून, अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
श्रीराम चौक, शिलाविहार, सावेडी येथील रुपेश कटारिया हे वडील जयप्रकाश, दोन भाव राजेश व जयप्रकाशसह एकत्र कुटुंबात राहतात. मार्केटयार्डमधील मर्चट बँकेजवळील दुकानात ते होलसेल भुसार मालाची विक्री करतात. वेगवेगळ्या वस्तूंचे साठवणूक करणार्या या दुकानात मुरमुरा, पोहे व इतर मालाची एजन्सी आहे.
१४ सप्टेंबर २०२५ रोजी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर रात्री १.३० च्या सुमारास शेजारचा पंकज गांधी यांचा फोन आला. दुकानाच्या दुसर्या मजल्यावर धूर बाहेर पडत असल्याचे सांगितले. तात्काळ रुपेश, दोन भाव व वडील दुकानात धावले. दुसर्या मजल्यावर मुरमुरा, पोहे, तीन गॅस गिझर व २०१५ ते २०२४ पर्यंतची खरेदी-विक्रीची बिले जळत असल्याचे दिसले. तातडीने अग्निशामक दलाला बोलावले. अग्निशमन पथकाने तातडीने दाखल होऊन आगी विझवली. २० हजार रुपयांचे ४० पोते मुरमुरा (१० किलो), २० हजार रुपयांचे २० भांडे मुरमुरा पोते (१० किलो), ६० हजार रुपयांचे तीन बजाज गॅस गिझर व एक लाख रुपयांची बिले व फायली जळाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुकानात जयप्रकाश कस्तुरचंद, रुपेश जयप्रकाश व राजेश जयप्रकाश कटारिया या तीन फर्मचे रेकॉर्ड जळाले.