नगर सह्याद्री वेब टीम :
रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ८.७ इतकी प्रचंड होती. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार (USGS), हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:२५ वाजता समुद्राखाली उथळ भागात झाला. या भूकंपामुळे रशिया, जपान, ग्वाम, हवाई आणि अलास्कासह पॅसिफिक महासागरातील अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, पॅसिफिक किनारपट्टीवर समुद्रात १ ते ३ मीटर उंचीच्या विनाशकारी लाटा उसळू शकतात.
जपानच्या एनएचके (NHK) या वृत्तवाहिनीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जपानच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात उत्तरेकडील होक्काइडो बेटापासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर होता. तर, USGS ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरापासून १३३ किलोमीटर आग्नेयेस, ७४ किलोमीटर खोलीवर होता. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८.० असल्याचे सांगण्यात आले होते. रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की येथे भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४.५४ वाजता ८.८ तीव्रतेचा भूकंप झाला.
टोकियो विद्यापीठाचे भूकंपशास्त्रज्ञ शिनिची साकाई यांच्या मते, “जेव्हा भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या उथळ भागात असतो, तेव्हा दूरवरच्या भूकंपांमुळेही त्सुनामी येऊ शकते. हा भूकंप त्याच प्रकारात मोडतो, कारण साधारणपणे ० ते ७० किलोमीटर खोलीवरील भूकंपांना उथळ भूकंप म्हटले जाते आणि या भूकंपाची खोली तर २० किलोमीटरपेक्षाही कमी होती.” दुसरीकडे, अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने अलास्काच्या अल्युशियन बेटांच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि हवाईसह पश्चिम किनारपट्टीवरील भागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यातही कामचटकाजवळ समुद्रात पाच शक्तिशाली भूकंप झाले होते, त्यापैकी सर्वात मोठा भूकंप ७.४ तीव्रतेचा होता.