नवी दिल्ली | वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटामुळे हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला. या भीषण स्फोटात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा सध्या एएनआयकडून तपास सुरू आहे. दरम्यान, या भीषण स्फोटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान ’या षडयंत्राचा सखोल तपास होणार. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही’, अशा तीव्र शब्दांत हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी उपस्थितीतांना संबोधित करताना दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणाबाबत भाष्य केलं. ’दिल्ली लाल किल्ल्यावर घडलेला बॉम्बस्फोट भीषण होता. हे प्रकरण समोर येताच तपासाला सुरूवात झाली. आपले तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करेल’, असं मोदी म्हणाले.
’या षडयंत्राचा सखोल तपास होणार. या बॉम्बस्फोट हल्ल्यामागे जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही’, असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय. ’दिल्ली बॉम्बस्फोटातील दोषींवर कडक कारवाई करणार’, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ’मी पीडित लोकांच्या भावना समजू शकतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी काल रात्रभर या घटनेच्या तपास यंत्रणेच्या संपर्कात होतो’, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, हा हल्ला नक्की का घडवून आणाला? बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागचं कारण काय? याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, दिल्ली बॉम्बस्फोट हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मृतांचा आकडा हा 12 वर गेला आहे. तर, अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे.
दोषींना सोडले जाणार नाही ; राजनाथ सिंह यांचा इशारा
दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आज त्यांनी, तपास यंत्रणा या घटनेचा जलद आणि सखोल तपास करत आहेत आणि अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल अशी माहिती दिली. तसेच या घटनेला दोषी असणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मी देशवासीयांना खात्री देऊ इच्छितो की देशातील प्रमुख संस्था या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत. तपासाचे निकाल लवकरच समोर येतील आणि या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. असा थेट इशारा दिला आहे.
दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट
दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गदच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर च्या माध्यमातून तपासणी करून आज सोडण्यात येत आहे तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहे. मुंबई, पुणे, पंढरपूर येथे हायअलर्ट देण्यात आला आहे.



