अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची, तसेच तिचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने तिचे ठरलेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सागर सुरेश कुटे (रा. देडगाव, ता. नेवासा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने 24 एप्रिल रोजी रात्री फिर्याद दिली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून, एप्रिल 2023 पासून सागर कुटे हा तिच्या घरी येऊन तिच्यावर मानसिक दबाव टाकत होता. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो काढले होते. यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये सागरने तिला सावेडी येथील लॉजवर नेऊन पुन्हा धमकी देत फोटो काढले. हेच फोटो नंतर त्याने फिर्यादीला व्हॉट्सअॅपवर पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकीही दिली.
या सर्व प्रकारानंतर सागरने तिच्या अश्लील फोटो तिचे लग्न ठरलेले असलेल्या तरूणाच्या इंस्टाग्रामवर पाठवले, ज्यामुळे तिचे लग्न मोडले. यानंतर पीडिताने आपल्या नातेवाईकांसह अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ई. बी. आव्हाड करत आहेत. दरम्यान, सागर कुटे हा पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.