अहिल्यानगर | नगर सह्याद्री
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा विषय राज्यात चांगलाच गाजला. असे असतानाच आता या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागणीसह या प्रकरणाशी संबंधित इतरही काही गंभीर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे जिल्हाव्यापी आंदोलन उभे राहणार आहे.
कोपड घटने विरोधात ऐतिहासिक मोर्चे निघाले होते. त्याचप्रमाणे जन आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा मोर्चा काढला जाणार आहे. विश्राम गृह येथे निवडक मराठा नेते, कार्यकर्ते यांच्या झालेल्या प्राथमिक बैठकीत येत्या काही दिवसात असा मोर्चा काढला जावा, असा सूर व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी स्व. संतोष देशमुख यांची अमानवी हत्या ही क्रूरतेचा कळस असून संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची नराधमांनी केलेली विटंबना प्रत्येक संवेदनशील माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला नेणारी आहे.
या अमानुष हत्येत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी कोणीही सुटता कामा नये, त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन जिल्ह्याव्यापी आंदोलन हाती घेण्याची गरज व्यक्त केली. जिल्ह्यात घडलेल्या कोपड अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्य व देशात अभूतपूर्व आंदोलने झाली.
कोपर्डी आंदोलनाप्रमाणेच या आंदोलनाचाही कोणीही एक नेता असणार नाही, असे स्पष्ट करून भोर यांनी या भव्य मोर्चासाठी येत्या 22 मार्च रोजी अहिल्यानगर येथे जिल्ह्याव्यापी नियोजन बैठक बोलवण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीतच मोर्चाचे सूक्ष्म नियोजन आणि मोर्चाची तारीख निश्चित केली जाईल.
बैठकीत संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, ॲड.अनुराधा येवले, देवेंद्र लांबे, नामदेव वांढेकर आदींनी सूचना केल्या. प्रास्ताविक निलेश म्हसे यांनी केले. समाजाच्या विषयावर सर्वांनी वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून हेवेदावे, मानपान असे न करता एकत्र आले पाहिजे असेही म्हसे म्हणाले. बैठकीस राजेंद्र कर्डिले, फिरोज शेख, ऍड.वैभव कदम, नंदकिशोर औताडे, सोमनाथ माने, मनोज सोनवणे, अशोक ढेकणे, निशांत भुतकर, शशिकांत भांबरे, लक्ष्मण मोहिटे, गोरक्षनाथ पठारे, बापू गोरे, आदी उपस्थित होते.