मुंबई । नगर सहयाद्री :-
मराठा आंदोलकर्ते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत पोहोचल्यानंतरच अभूतपूर्व गर्दी झाली आहे. आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी 5 हजार जणांची परवानगी दिली असताना अवघ्या काही मिनिटांमध्येच आझाद मैदान तुडुंब भरून गेलं आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आता रस्त्यावर ठिय्या मांडण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मराठा वादळ अवतरलं असून अभूतपूर्व रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी आज मुंबईमध्ये दिसण्याची चिन्हे आहेत. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानापासून काही मिनिटाच्या अंतरावर असून ते मैदानात पोहोचताच मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक मराठ्यांच्या गर्दीसमोर कमी दिसून येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आझाद मैदान आंदोलन करणारच अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र, न्यायालयाकडून प्रथम त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून न्यायालयात धाव घेण्यात आल्यानंतर न्यायालयाकडून त्यांना एक दिवसाची सशर्त परवानगी देण्यात आली. त्यामुळे आज एक दिवस आंदोलन होणार आहे. मात्र, या गर्दीसाठी पाच हजारांची संख्या घालून दिली होती. मात्र, गर्दी ही गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाशी टोलनाक्यावर सुद्धा हजारो गाड्या असून राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून आंदोलन मुंबईमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईमधील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
मुंबईमध्ये मराठ्यांच्या वादळासमोर गर्दी होणार हे लक्षात ठेवून मुंबई पोलिसमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक रस्त्यावर बसले आहेत. विविध ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सीएसएमटी परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक कोंडी हटवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात येत आहे. ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विनंती केली जात आहे.