जालना / नगर सह्याद्री
मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. ४ जूनपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला गावकऱ्यांनीच विरोध केला असून त्यांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी अंतरवाली सराटीमधीलच काही गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील हे ४ जूनला पाचव्यांदा उपोषणाला बसणार आहे. त्यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनीच विरोध दर्शवला आहे.
जरांगे पाटील यांचे सहकारी राहिलेले डॉ. रमेश तारख, किरण तारख यांच्यासह काही गावकऱ्यांचा या उपोषणाला विरोध आहे. जरांगे पाटीलांच्या उपोषणाला परवानगी देवू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर गावातील शंभर लोकांच्या सह्या आहेत.
आंतरवालीतील सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जरांगे पाटील यांचे आंदोलनद्वेष, राग, तिरस्कारमध्ये परावर्तित झाले असल्याचा आरोप करण्याक आला असून गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा ही बिघडलाय. या जातीय तेढातून भांडणे होऊन, कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे या निवेदनात लिहिले आहे.