मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
परभणी / नगर सह्याद्री –
29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे समाजाला आवाहन केले आहे. सध्या ते मराठवाड्यात संवाद दौरा करत आहेत. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत इशारा पण दिला.
परभणी येथील सावली विश्रामगृहात त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस हे गोव्यात ओबीसी मेळाव्यासाठी गेले होते. त्यांनी तिथे जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरल्याचे ते म्हणाले. आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. मला याची कुणकुण लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
तर महाराष्ट्र कायमचा बंद
आमचं आंदोलन शांततेत होणार आहे. फडणवीस यांनी जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कायम स्वरुपी बंद राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठा त्रास सहन करावा लागेल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरही गंभीर आरोप केले.
लोकांमध्ये चर्चा आहे देवेंद्र फडणवीस षडयंत्र घालत आहेत, आधी चर्चा खोटी वाटत होती मात्र आता सिद्ध झाले. फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसी अधिवेशन घेतलं, आणि त्यांनीच तेथे सांगितलं मी ओबीसीसाठी लढणार, मग मराठा समाज साठी कोण लढणार, दलित मुस्लिम समाजाला तुम्हाला मतदान केलं नाही का, असा सवाल त्यांनी विचारला. मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं आणि तुम्ही ओबीसीसाठी लढणार, मग मराठ्यांसाठी कोण लढणार. मराठा समाज बद्दल किती द्वेष देवेंद्र फडणवीस मध्ये आहे हे सिद्ध झाले. मीडियाने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले म्हणून मुंबईला जाणार, तर ते म्हणाले ते पोलीस बघून घेतील. बघून घेतील म्हणजे नेमकं काय, फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस हे समीकरण राज्यात आहे. तुम्ही काय हल्ले घडून आणणार का मागच्या सारखे असा सवाल करत एका पोराला जरी धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
आता माघार नाही
मी मॅनेज होत नाही त्यामुळे माझ्यावर फडणवीस यांना हल्ला करायचा आहे, हे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडणार आहे. मराठ्यांना आवाहन आहे की, त्यांनी दिसेल त्या मार्गाने मुंबईत दाखल व्हायचे आहे. यंदा माघार नाही, आरक्षण घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ, असे जरांगे पाटील म्हणाले.