संतोष देशमुखांच्या भावाला 20 कोटी रुपयांची ऑफर
बीड । नगर सहयाद्री:-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी दादा गरूड याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वी दादा गरूडचे तीन व्हिडिओ समोर आले होते. मात्र, आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्याने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या स्वरूपाने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना ऑफर देण्यात आल्याचं दिसून येत आहे.
यापूव समोर आलेल्या व्हिडिओत जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा आणि गंगाधर काळकुटे यांना लोकसभेसाठी 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला होता. आता या आणखी एका व्हिडीओत एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दादा गरूडने असा दावा केला आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. हा दावा करताना त्याने धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांचा उल्लेख केला आहे.
दादा गरूडच्या म्हणण्यानुसार, ही ऑफर शासकीय बॉडीगार्ड संतोष जाधव याच्यासमोर दिली दिली होती. यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांना बोलवून, आपण धनंजय मुंडे यांना गुंतवून टाकू, असे म्हटले होते. मात्र, धनंजय देशमुख यांनी हे माझ्या तत्त्वात बसत नाही असे म्हणत या प्रस्तावांना नकार दिला, असा दावा व्हिडीओत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या व्हिडीओंची सत्यता आणि त्यामागील सूत्रधार कोण आहेत, याचा कसून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी विवेक उर्फ दादा गरूड आणि अमोल खुणे या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची नावे जोडली जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.



