मुंबई / नगर सह्याद्री –
श्रावण सोमवारनिमित्त मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज भिमाशंकर येथे दर्शनाला येणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भिमाशंकरला येणार आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. तसेच विधानसभा निवडणुका लढवण्याबाबतही जरांगे पाटील यांनी सूचक संकेत दिले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“भीमाशंकरला निघालोय, दुपारी दोन वाजता दर्शन घेईन. आमचा दौरा गेल्या आठवड्यात ठरला होता. काल रात्री समजलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही येत आहेत. मात्र त्यांची वेळ मला माहित नाही. आम्ही आमच्या नियोजनानुसार जाणार आहोत. भीमाशंकर चरणी आरक्षणासाठी साकडे घालू, भीमाशंकर या सरकारला सद्बुद्धी देईल. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. देवाच्या दारात थोडी अशी चर्चा करतात, चर्चा ही मुंबईलाच होऊ शकते,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आत्ताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने यांना ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेत ही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत, मात्र या दरम्यान समाजासोबत विधानसभा बाबत चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवारचं उमेदवार आहेत. राजकीय अनेक नेते जे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत, ते मला भेटायला येतात. मात्र मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10 वर्षे कामं करतोय अन तीन पक्ष एकत्र आलेत. मग आमचं काय होणार? आम्हाला हे घराणं नको, दुसरा म्हणतो ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असेही ते म्हणाले.
“महायुती आणि मविआमधील नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू? विधानसभा लढायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार, मग समाजाने ठरवावं. आमची एकजूट असल्यानं कोणी कोणाचे पाय खेचणार नाहीत. लाडक्या बहीण योजना आणली, ही चांगलीच. पण आरक्षणाचे काय? दाजी तर चिखलात काम करून मेला की, त्याचं काय. ते फक्त नादी लावतात. बरं हे सगळं आमच्या करातून सुरु आहे, कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देत आहे,” असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
फडणवीसांवर निशाणा
तसेच देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत अन शत्रू ही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन आमदारांना काम करू देत नाहीत, अगदी आरक्षणाबाबत ही बोलू देत नाहीत. फडणवीस साहेब मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, आमच्या समाजाला ही राजकारणात जायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार, असा इशाराही जरांगेनी दिला.