मुंबई / नगर सह्याद्री :
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. ते आज रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असली, तरी पोलिसांनी काही अटींसह केवळ एका दिवसासाठी आंदोलन करण्याची मुभा दिली आहे. तथापि, मनोज जरांगे पाटील मात्र बेमुदत आंदोलन करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट करत आहेत. आता या पार्श्वभूमीवर सरकारने सावध भूमिका घेतल्याचे बघायला मिळतंय.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या व्यक्तीशी बोलणे झाले होते. मात्र, त्यांचा काही निरोप आला नाही. मग मी तो विषय घेतला नाही. कालही नगरमध्ये भेटावे, असे नियोजन होते. मात्र, ते मुंबईला जाण्याबाबत ठाम होते. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करू, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार : राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे ते आंदोलन करतायेत याचे कौतुकच आहे. त्यांच्या मागण्या ते सार्थपणे मांडत आहेत. उदय सामंत यांच्याशी काल बोलणे झाले होते, उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार आहोत. समितीशी बोलून याबाबत वेळ ठरवता येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.