मुंबई | नगर सहयाद्री:-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वाटाघाटींना आणि चर्चेला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) राजेंद्र साबळे हे मंगळवारी सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचले आहेत.
राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून मनोज जरांगे पाटील यांना मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल, अशी चर्चा होती. उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत:हून पुढे टाकले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, असे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी सांगितले.
भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे एक्सवर ट्विट
भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत जारंगे पाटलांना मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. उपाध्ये यांनी गणेशोत्सवाच्या आनंदात व्यत्यय आणू नये आणि सहकार्याने मराठा समाजाच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन केले आहे. केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन उद्या होत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेने साजरा करतो. नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचे आंदोलन उभे करून जारंगे मोर्चाने मुंबईत येत आहेत.अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये, यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा, हीच त्यांना विनंती आहे.
मोर्च्याचा मार्ग आणि वेळापत्रक
27 ऑगस्ट: सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटी येथून प्रस्थान. मार्ग: अंतरवाली – पैठण – शेवगाव (अहिल्यानगर) – कल्याण फाटा – आळे फाटा – शिवनेरी (जुन्नर मुक्काम). 28 ऑगस्ट: शिवनेरीहून खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर. रात्री आझाद मैदानावर पोहोच.
29 ऑगस्ट: सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू.