Manoj Jarange Patil:-मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही राज्य सरकारने मार्गी लावला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपले दंड थोपटले असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. 7 ऑगस्टपासून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासह इतर समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुका निहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटी येथे आणून द्यायची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील येत्या विधानसभा निवडणुकीत 150 ते 200 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तसेच 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन दौरा करणार आहेत.13 ऑगस्टपासून इच्छुकांनी दिलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल.
7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. अर्जाच्या छाननीसाठी कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान या प्रक्रियेची पूर्णता होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबीमध्ये आरक्षण दिल्यास, निवडणुकीच्या तयारीऐवजी जल्लोषाची तयारी करून राज्यभर जल्लोष केला जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे
.दरम्यान, प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मनोज जरांगे यांच्यासह दोन जणांविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. यानंतर त्यांच्या वकिलांनी ते 2 ऑगस्ट रोजी हजर राहतील, असा अर्ज कोर्टाला दिला होता.