मुंबई / नगर सह्याद्री :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगेंनी केली आहे. मुंबईत आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत.
आरक्षणच्या मागणीवर मराठा आंदोलक ठाम असून ठिकठिकाणी भगवे झेंडे पाहायला मिळत आहेत. शासनाने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुबंई पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. आझाद मैदानाला लागून असलेल्या सीएमसएमटी येथे रॅपिड अॅक्शन फोर्स दाखल झाली आहे. याशिवाय पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आझाद मैदानावर सत्ताधारी आणि विरोधातील राजकीय नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. मात्र, भाजपच्या एका आमदाराने थेट शरद पवारांचे नाव घेत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेल्या स्फोटक दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचं खळबळजनक दावा भाजप आमदार संजय केनेकर यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले केनेकर?
शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बूमरँग होणार आहे. हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर सोडलेला आहे. शरद पवार हे समाजाचे नुकसान करत आहेत. हा सुसाईड बॅाम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहचवेल. यामुळे आता केनेकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याला मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देणार हे पाहाव लागणार आहे.
जरांगेंचा मुख्यमंत्र्यावर आरोप
आझाद मैदान मराठा आंदोलक बांधवांनी भरलं आहे. आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचं भाष्य केलं. ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचेय, आरक्षण द्यायचं नाही, असा थेट आरोप जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण करायचे नाही. आम्ही ओबीसीमध्येच आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. हे आमचं म्हणणं समजून घ्यावे, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. सरकारने संभ्रम निर्माण करू नये. राज्य अस्थिर करण्याचे काम मंत्र्यांकडून होऊ नये, असंही जरांगे बोलताना म्हणाले आहेत.