Manoj Jarange Patil: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पीकविमा घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांना धारेवर धरणारे भाजपा आमदार सुरेश धसयांनी अचानकच धनंजय मुंडे यांची बंद खोलीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
धस यांनी नुकतीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी गावकऱ्यांनी पोलीस आणि गुंडांच्या संगनमताबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली.
जरांगे पाटील म्हणाले, सुरेश धस यांचा विषय माझ्यासाठी संपला आहे. त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. समाजाने त्यांना तळहातावर घेतलं होतं, मग एवढ्या क्रूर व्यक्तीला भेटण्याची गरज काय होती?, धस यांच्यावर जर पक्षाचा दबाव होता, तर त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं.
पक्षाने प्रकरण दाबण्यासाठी सांगितलं, म्हणून मी मागे सरकत आहे, असं त्यांनी सांगायला हवं होतं. जर समाजाच्या बाजूने लढता, तर मग धनंजय मुंडेंना भेटायला जाऊ नका. उलट, पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्या,” असं मनोज जरांगेंनी ठणकावलं.