मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षाला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्यात. यंदाची निवडणूक 2019च्या किंवा त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत अनेक अंगांनी वेगळी असल्याचं बोललं जात आहे.
यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, “मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला निवडून आणायचं ज्याला पाडायचं त्याला पाडा. आमच्या मागन्या मान्य करायच्या नाहीतर सामूहिक उपोषण होणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.
मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचे काम करायचं नाही. राज्यात अर्धी गावं आमची आहेत. तुमच्या मागणी मान्य करायच्या, आमच्याशी बेईमानी करायची नाही. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की, मी पुन्हा उपोषणाला बसलोच समजा. तुम्ही पुन्हा या, मी पुन्हा उपोषणास बसतो. काय व्हायचे ते बघू या. आपल्यापाशी सुट्टी नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, यापूर्वीही तेच होते. दुसरे कोणी नव्हते. मराठे सगळ्यांशी खेटले आहेत. मराठ्यापुढे कोणीही सत्ताधारी नाही. मी मराठ्यांची पोर मोठे करण्याचा ध्यास घेतला आहे. आरक्षण देण्याचे वचन समाजाला दिलेले आहे.
पडणारे पडले, निवडून येणारे आले. आपण त्यांचे संसार मोठे केले. आम्ही पडलेला आणि निवडून आलेला दोघांनाही मतदान केलेले आहे. आता या दोघांनी मराठ्यांच्या गोरगरीब पोरांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे. असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले आहेत.