पुणे । नगर सहयाद्री-
पुण्यातील कल्याणीनगर अपघातील मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा हाती आला आहे. अल्पवयीन तरुणाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक केली आहे.
दरम्यान या प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. सुरुवातीला अल्पवयीन मुलाला पोलिसांकडून देण्यात आलेली विशेष वागणूक त्याचबरोबर त्याच्या मेडिकल रिपोर्टबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामध्येच आता अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
तर त्या अगोदर या प्रकरणामध्ये पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत. कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शु्क्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.