मुंबई | नगर सहयाद्री
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर फेरबदल झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत.
मंत्रिमंडळात हा बदल ३१ जुलै रोजी उशिरा करण्यात आला. यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक राज्य सरकारकडून जारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय ‘कामगिरी आणि पारदर्शकतेच्या निकषांवर आधारित’ घेतला असल्याचे स्पष्ट केले. माणिकराव कोकाटे यांच्यावर अधिवेशनाच्या दरम्यान मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप करत राजीनामा घेण्याची मागणी केली होती.
दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून याआधी त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय होते. आता ते राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.दरम्यान, मंत्रिमंडळात आणखी मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली जात होती. विरोधकांकडून एकूण पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती, त्यात योगेश कदम, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या नावांचा समावेश होता. मात्र सद्यस्थितीत केवळ कोकाटे यांच्या खात्यातच बदल करण्यात आला आहे.